समतानगरात २१ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या; मारहाणीमुळे टोकाचे पाऊल उचलल्याचा नातेवाईकांचा आरोप
मृतदेहावर मारहाणीच्या खुणा असल्याची चर्चा ; पोलिसांकडून पंचनामा, पुढील तपास सुरू
गंगापूर | प्रतिनिधी : शहरातील समतानगर परिसरात २१ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री (दि. २९ ते ३० जुलै दरम्यान) उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत युवकाचे नाव भगवान सुभाष निकम (वय २१, रा. समतानगर परिसर, जुना मांजरी रोड, गंगापूर) असे आहे. भगवान याने नवीन घरातील हुकाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे सांगण्यात आले. गुरुवारी सकाळी वडील आणि भावाला तो फासावर लटकलेल्या अवस्थेत दिसला. त्यांनी तातडीने त्याला खाली उतरवून गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन मुंदडा यांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
दरम्यान, या प्रकरणात नातेवाईकांनी गंभीर आरोप करत, भगवानला मारहाण करण्यात आल्यामुळेच त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा केला आहे. तसेच त्याच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा असल्याचीही चर्चा सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून, संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश जाधव करीत आहेत.
भगवान निकम यांच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे.
टीप : मृत्यूचे नेमके कारण आणि नातेवाईकांनी केलेल्या आरोपांची सत्यता पोलीस तपास व वैद्यकीय अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.


Post a Comment
0 Comments